मुंबई -पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी डिजिटल शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. यापैकी बहुसंख्य टॅब नादुरुस्त झाल्याने शिक्षण विभागावर टीका केली जात आहे. यामुळे इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना नवे टॅब देण्यात यावेत, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार ९४४.४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिक्षण समितीत सदस्यांनी चर्चा करून हा अर्थसंकल्प मंजूर केला. त्यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी असे निर्देश दिले. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने पालिकेकडून २७ शैक्षणिक वस्तू दिल्या जात आहेत. सन २०१५-१६ पासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी व्हावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख यांच्या हस्ते २२ हजार टॅबचे वाटप करण्यात आले. त्यानंतर २०१७ मध्ये १३ हजार टॅब घेतले जाणार होते. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी टॅब मिळत नसल्याने वाद झाला होता. आजही यातील अनेक टॅब नादुरुस्त आहेत. टॅबमध्ये मेमरी कार्ड नसल्याने टॅबमध्ये अभ्यासक्रम टाकता आलेला नाही. यावर शिक्षण समितीच्या बैठकीत अनेकवेळा टीका करण्यात आली. त्यामुळे 'टॅब योजना' फेल गेल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केला आहे.