मुंबई - पावसाळ्यात इमारती किंवा इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडतात. अशीच घटना आज (गुरूवारी) पुन्हा घडली. कुर्ला-पश्चिम येथे पालिका कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
कुर्ला-पश्चिम सीएसटी रोड येथे तळ अधिक तीन मजली नेता इमारत आहे. या इमारतीला नुकतीच धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली होती. आज (गुरुवारी) दुपारी 12 च्या सुमारास या इमारतीचा एका कोपऱ्यातील भाग कोसळला. इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 ची अॅम्ब्युलन्स, पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पडलेल्या इमारतीचा ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.