महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधेचे कायमस्वरुपी रुग्णालय तयार करा - मुख्यमंत्री - सांसर्गिक आजारासाठी रुग्णालय मुंबई

कोरोना युद्ध आपण नक्कीच जिंकू. मात्र, भविष्यातही अशाप्रकारे सांसर्गिक आजारांवर उपचारासाठी कायमस्वरुपी सोय होण्याच्या दृष्टीने मुंबई आणि परीसरात रुग्णालय उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

cm uddhav thackeray news  hospital for Contagious disease mumbai  cm on maharashtra corona situation  महाराष्ट्र कोरोना अपडेट  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज  सांसर्गिक आजारासाठी रुग्णालय मुंबई  महाराष्ट्र कोरोना अपडेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jul 7, 2020, 6:32 PM IST

मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानावर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन तसेच आयसीयू देखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली तरी आता पुढचं पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरुपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोरोना रुग्णांसाठी तयार केलेले रुग्णालय

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या सहाय्याने मुलुंड, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहीसर, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स आणि बीकेसी या ठिकाणी १२० खाटांचे अतिदक्षता विभाग अशा ३ हजार ५२० खाटांच्या जम्बो सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

कोरोना रुग्णांसाठी तयार केलेले रुग्णालय

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशी मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने देशासमोर ठेवली आहे. या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरुपी रुग्णालयाइतकीच भक्कमपणे झाली आहे. यासर्व सोयी अवाक करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना युद्ध आपण नक्कीच जिंकू. मात्र, भविष्यातही अशाप्रकारे सांसर्गिक आजारांवर उपचारासाठी कायमस्वरुपी सोय होण्याच्या दृष्टीने मुंबई आणि परीसरात रुग्णालय उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांचा आदर्श महाराष्ट्राने देशापुढे उभा केला आहे. त्यामध्ये देशातील पहिले राज्य जेथे ६० टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, आयसीयू खाटा आहेत. या सोयी सुविधांमध्ये रोबोटेक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णांच्या उपचारासोबत डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. या जम्बो उपचार सुविधांच्या माध्यमातून लोकांना जीवनदान देतानाच जगाला दिशा देण्याचे कामही केले जात असल्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांच्या उपचार सुविधांची निर्मिती करताना महाराष्ट्राने देशासमोर आदर्श उभा केला आहे. ज्याप्रकारे उपाययोजना हाती घेतल्या आहेत ते पाहता कोरोनावर विजय मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मुलुंड, बीकेसी येथील कोरोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची सुविधा कार्यान्वित झाली असून उद्यापासून तेथे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. याठिकाणच्या अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचार, देखभालीसाठी खासगी विशेषज्ञ, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सेवा घेण्यात येणार आहे. हा देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.

मुलुंड येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या १६५० खाटांच्या कोरोना रुग्णालयात १००० खाटा ऑक्सिजन सोयींयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी आहेत. याठिकाणच्या ५०० खाटा ठाणे महापालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दहिसर येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने ९५५ खाटांचे रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी १०८ खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. या रुग्णालयातील २०० खाटा मीरा-भाईंदर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नमुन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांची क्षमता असलेले कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details