मुंबई- राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील शहरांच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूद केल्याची आणि सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.
अर्थसंकल्प २०१९ : स्मार्ट शहरांसाठी अच्छे दिन; मुंबई मेट्रो २७६ किमीपर्यंत विस्तारणार - AIRPORT
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील शहरांच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूद केल्याची आणि सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील 385 शहरातील नागरिकांकरीता 6 हजार 895 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या 8 शहरांसाठी यंदा 2 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात स्वच्छता अभियानांतर्गत 254 शहरामंध्ये 2 हजार 703 कोटी रूपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर आहे. तर शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून नागरी भागातला घनकचरा व्यवस्थापनासाठी 2456 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली.
अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग विमानतळ विकास मोहीम वेगाने सुरू असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. तर अहमदनगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा-देसाईगंज, इंदौर-मनमाड रेल्वेची कामे प्रगती पथावर असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली असल्याचे सांगत लवकरच हे प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच मुंबई उपनगरीय वाहतूक सेवा सुधारण्याचा निर्धार व्यक्त करत मुंबई मेट्रोची व्याप्ती 276 कि.मीपर्यंत विस्तारणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहात दिली.