मुंबई - सीएसएमटी येथे झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवरील पाच पादचारी धोकादायक पूल 30 एप्रिलपर्यत तोडण्यात येणार होते. प्रत्येक आठवड्याला एक पादचारी पूल मध्य रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाकडून तोडण्यात येणार होते. मात्र, एक महिना उलटून गेला तरी रेल्वेकडून विक्रोळी स्थानकामधला पादचारी पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सीएसएमटी स्थानकालगतचा पादचारी पूल कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर खबरदारी म्हणून मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत पाच पादचारी पूल धोकादायक ठरवले होते. मध्य रेल्वेच्या मार्गावरील भांडुप स्थानकातील कल्याण दिशेचा, दिवा स्थानकातील ठाणे दिशेचा, विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा, कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेचा आणि कल्याण स्थानकातील पादचारीपुलाचा यात समावेश आहे. पूल जुने झाले असून त्यांना पाडण्यात आले आहे. मात्र, या धोकादायक पुलांमध्ये विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा पुलावर अद्याप हातोडा पडलेला नाही.