मुंबई - सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय ज्या मंत्रालयातून घेतले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे ये-जा करत असतात. मंत्रालयात पास शिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यातच कोरोनामुळे देखील सर्वांना प्रवेश दिला जात नाही. ज्यांना प्रवेश मिळतो त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. मात्र, त्याच मंत्रालयाच्या आवारात आता दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस एक खोली आहे. तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या बाटल्या मंत्रालयात गेल्याच कशा? त्या नेमक्या कुणाच्या? असा प्रश्न विचारला जात आहे.
विरोधक आक्रमक
'मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं आपल्या न्याय-हक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात? दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या?या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे? धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेत्यांसाठी करतंय, डान्सबारसाठी का रेस्टॉरंटवाल्यांसाठी काम करत आहे की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय? हे एकदा जनतेला कळलं पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. विरोधी पक्षनेता म्हणून माझी ही मागणी आहे', असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.