मुंबई -राज्यपालांनी हेवेदावे विसरून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नामनियुक्त सदस्यांची नेमणूक करावी असे राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात सांगण्यात आले. विधान परिषदेच्या नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी 12 नावे राज्य सरकारकडून राज्यपालांना पाठविण्यात आली आहेत. ही नावे पाठवून आठ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. तरीही अद्याप सदस्यांची नियुक्ती झाली नाही. म्हणून राज्य सरकारच्या वतीने हाय कोर्टात बाजू मांडण्यात आली. यावेळी सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिवादी करुन याबाबत मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण -
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या जागा अजूनही रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी यासाठी 12 नावांची शिफारस राज्यपालांकडे केलेली आहे. मंत्रिमंडळात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर ही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली. मात्र, यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या बारा सदस्यांच्या नियुक्तीबाबत नाशिक येथील रहिवासी रतन सोनी यांनी हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.