मुंबई Thackeray Group Vs Shinde Government : केंद्रासह राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत त्याची जनतेला माहिती देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातर्फे डोंबिवली, कल्याणमध्ये ‘चला होऊ द्या चर्चा’ हा चौक सभांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम केंद्र, राज्य सरकारच्या भूमिका, धोरणे आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवित असल्याचं म्हणत पोलिसांनी डोंबिवली, कल्याणमधील या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. यावरुन ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवली येथील शहर प्रमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी (12 ऑक्टोबर) उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
काय आहे प्रकरण :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रम आयोजन करण्यात आलं. ऑक्टोबर 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमांना रीतसर परवानगी मिळून कार्यक्रम करण्यात आले. परंतु एका कार्यक्रमात कोणीतरी आयोजकांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना पंतप्रधान मोदींसंदर्भात असभ्य शब्दांचा उच्चार केला. त्यामुळं त्याचा संबंध पोलिसांनी जोडून स्वतःहूनच या कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द केली. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं याला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.