मुंबई -सायन रेल्वे स्थानकावर आपण रेल्वे टीसी असल्याचे सांगत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोगस टीसीचा प्रकार कुर्ल्याचे वरिष्ठ तिकीट तपासनीस सिकंदरजित सुखदेव सिंग यांनी निदर्शनास आणून दिला आहे. या बोगस तिकीट तपासकाचे नाव सुमित सुमित ठाकूर असून, तो स्वत:ला टीसी असल्याचे सांगून संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही उकळत होता.
अशी उघडकीस आली घटना-
मध्य रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासक सिकंदरजित सुखदेव सिंग सोमवारी कुर्ला रेल्वे स्थानकावरून ड्युटी संपवून आपल्या निवासस्थानी जात होते. यादरम्यान सायन रेल्वे स्थाकानांवर उतरले असताना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक अनोळखी इसम तीन इसमाना पकडून घेऊन जाताना दिसले. तेव्हा सिकंदरजितला त्या तिकीट तपासकावर संशय आला. त्यांनी वरिष्ठ टिकीट तपासक चित्रा गणेश वाकचौरे यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा चित्रा वाकचौरे यांनी बनावट टीसीला याबाबत विचारपूस केल्यावर, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. तसेच या बनावट टीसीच्या खिशाला सीआरएमएसचे कार्ड होते. त्याबाबत बोगस टीसीला विचारले असता, त्याने मध्य रेल्वेमध्ये कामाला असल्याचे सांगितले.त्यानंतर ओळखपत्र दाखवण्याबाबत विचारले, असता त्याने दाखविलेले ओळखपत्र हे एका खाजगी कंपनीच्या हाउसकीपिंगचे होते. त्यानंतर वरिष्ठ टिकीट तपासक चित्रा गणेश वाकचौरे यांनी या तिन्ही इसमांना दादरच्या लोहमार्ग पोलिसांकडे घेऊन गेले.