मुंबई: गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अंधेरी परिसरातील मरोळ येथे एका फ्लॅटमध्ये मृदुल जोशी आणि अभिषेक मृदुल या दोन भावांनी बोगस कॉल सेंटर सुरू केले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर विमान तिकीटावर भरघोस ऑफर देऊन ठगबाजी केली जात होती. गुन्हे शाखेच्या कक्ष-8 ला या टोळक्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' 9 आरोपींना अटक:मुख्य सूत्रधार मृदुल अशोक जोशी (वय 34), फैजान गूलशाद अहमद (वय 25), आशिष विजय शर्मा (वय 26), सलमान सहित मोहम्मद सिद्दिकी (वय 48), देवेंद्र तीर्थ सिंह (वय 32), मोहम्मद उमेध उर्फ गौरव (वय 25), साहिल दर्शन सिंह उर्फ दीपक कुमार (वय 19 ) संतोष रमेशचंद्र कांडपाल (वय 29) आणि श्रीराम मुकुंदकुमार मथीलकथ (वय 44) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर उपासना अशोक सिंग (वय 35) या आरोपी महिलेला 41 अ प्रमाणे नोटीस देऊन जाऊ देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुख्य आरोपी मृदुल जोशी हा मूळचा दिल्लीचा असून त्याच्या विरोधात जयपूरमध्ये ईडीचा गुन्हा दाखल आहे. मुंबईत व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
अशा रीतीने फसवले जायचे:10 ऑगस्टला कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. यानुसार अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरातील ३०१/ए, मिलल कमर्शिया, हसन पाडा रोड या ठिकाणी विमान प्रवासाकरिता इच्छुक ग्राहकांना, विशेषतः कॅनडा देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फसवले जात होते. तसेच देश-विदेशातील नागरिकांना इंटरनेट, व्हॉट्सअॅपव्दारे संपर्क साधून आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल या सोशल मीडिया माध्यमाव्दारे जाहिरात करून फसवले जात होते. या जाहिरातीस प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात विमान तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखविले जायचे. यानंतर त्यांना तिकीटाची रक्कम हस्तांतरीत करण्यास लावून तसेच त्याकरिता बनावट विमान तिकीटे व बिले पाठविली जायची. रक्कम प्राप्त होताच त्यांच्याशी असलेला संपर्क तोडला जायचा आणि मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जायची.