मुंबई - देशात दिल्ली, अहमदाबाद आदी ठिकाणी कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. मुंबईतही मंदिर आणि इतर सर्व व्यवहार सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका दुसऱ्या लाटेसाठी सज्ज असली तरी रुग्ण संख्या वाढू नये म्हणून मुंबईकरांनी साथ द्यावी, त्याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही -
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच ते सहा दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर बोलताना दिल्ली, अहमदाबादमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याठिकाणी दुसरी लाट आली असे म्हणता येईल. मुंबईत रुग्ण संख्या वाढत असली तरी सध्या त्याला दुसरी लाट म्हणता येणार नाही. मात्र मुंबईत नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही असे महापौर म्हणाल्या.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे - मुंबईसह राज्यात सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. मंदिरे प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी लोकांची गर्दी होत आहे. लोकांना गर्दी करू नका असे आवाहन केले असले तरी नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिक मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टनसिंगचे पालन करत नाहीत. रुग्ण संख्या वाढली तरी पालिका आणि राज्य सरकार सज्ज आहे. मात्र लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून साथ द्यावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
कुटुंबाला कोरोना होऊ देऊ नका -
एखाद्याला कोरोना झाला तर त्यांच्यामुळे त्याच्या घरातील कुटूंबाला कोरोना होण्याची शक्यता आहे. कोरोना आजारी व वृद्ध लोकांना लवकर होतो. त्यामुळे या लोकांना कोरोना होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबाला, बाजूच्या लोकांना आपल्यामुळे कोरोना होणार नाही. यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.