मुंबई BMC Khichdi Scam Case :उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांची बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेशी संबंधित कथित खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आहे. अमोल कीर्तिकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असून ते ठाकरे गटाचे उपनेते आहेत. त्यामुळेच अमोल कीर्तिकर यांच्यामागं चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. नुकतीच युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांची देखील खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली होती.
आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची चौकशी :कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं अमोल कीर्तिकर यांना समन्स देऊन बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. याआधी दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.
खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा :कथित कोवीड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तीकरांची बुधवारी सहा तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाकडून सरकारवर मोठी टीका करण्यात येत आहे.