मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालात शिंदे गटाने बाजी मारल्यानंतर आता १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या दरबारी आहे. तरीसुद्धा शिंदे गट व त्याचबरोबर भाजप त्याबाबत निश्चिंत आहेत. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीकरिता भाजपसह शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात सक्रियता दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांचे मुंबईवर विशेष लक्ष- शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेऊन बंडखोरी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सत्ता उलथवून टाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात ठाकरे गटासमोर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे मोठे आव्हान असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून राज्यातील सत्ता हिसकावल्यानंतर गेली २५ वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेली महापालिकासुद्धा हिसकावून घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे. या प्रयत्नाला भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस संपूर्ण ताकद देत आहे. फक्त एकनाथ शिंदे यांनीच नाही तर देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे.
ठाकरे गटातील नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न? भाजपचे मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचा शिंदे - फडवणीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई महानगरपालिका हातून निसटता कामा नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. यासाठी पक्षात नव्याने आलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकाचं सत्र सुरू झाले आहे. त्याचबरोबर आगामी काही दिवसात शिवसेना ठाकरे गटातील आणखी काही माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजप व शिंदे गटात येण्याची शक्यता आहेत. भविष्यात पालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक जिंकून आणण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट आणि भाजप करत आहे.
कसे आहे नियोजन?-सर्वसामान्य जनतेची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, तसेच त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट मुंबईच्या गल्लीबोळात वॉर्डा-वॉर्डात जाणार आहेत. यासाठी शासकीय योजनांची जत्रा लवकरच सुरू करणार आहे. त्यांच्या माध्यमातून मुंबईतील तळागाळातल्या लोकांना शासकीय लाभ घेता यावा, यासाठी ही योजना असणार आहे. हे अभियान मुंबईतील प्रत्येक वार्डात सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सोबतच बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाताहत- मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ९५ नगरसेवक आहेत. त्यापैकी २०१७ च्या निवडणुकीतले १० माजी नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर त्याआधीचे ११ माजी नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्षांकडील १६ अपात्र आमदारांच्या सुनावणी निकालानंतर प्रत्यक्षात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या नाराज नेत्यांना शोधण्यास सुरुवात-हौशे, नवशे, तसेच दुखावलेले तिकिटांच्या आशेने शिंदे गटात सामील होतील, असा अंदाज आहे. यासाठी या सर्व नाराज असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांची शोधमोहिम घ्यायला शिंदे गटाकडून आतापासूनच सुरुवात झाली आहे. तसेच शिंदेंना मुंबईत आपले अस्तित्व दाखवायचं असल्यास तळागाळात मेहनत घ्यावी लागणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्णपणे जबाबदारीने वागत असून ते नक्कीच चमत्कार घडवतील असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी व्यक्त केला आहे.