मुंबई - मुंबईमध्ये होऊ घातलेल्या मेट्रोचे कारशेड कांजूरमार्ग येथील पर्यायी जागेत बांधावे अशी मागणी केली जात आहे. मात्र, असे केल्यास खासगी जमीन मालकाला ५००० कोटी रुपये द्यावे लागतील. कांजूरमार्ग येथील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या ठिकाणी कारशेड उभारण्याचा विचार केल्यास मेट्रो प्रकल्प कधीही उभा राहू शकत नाही. असे सांगत मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मेट्रोची तळी उचलण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्यास पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे. त्यानंतरही कारशेडसाठी २७०० वृक्ष तोडण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. झाडे तोडण्याला विरोध म्हणून सत्ताधारी शिवसेनेच्यावतीने सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समिती सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यावेळी पालिका प्रशासनाचा खुलासा करताना पालिका आयुक्त बोलत होते.
हेही वाचा -आरे वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर; लोकांचा विरोध मग प्रकल्प कशासाठी?
कारशेडसाठी आरेच का -
यावेळी बोलताना कांजूर येथील जागा शासकीय नसल्याने त्या जागेची मागणी करणे शक्य नाही. कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. कारशेड हा मेट्रोचा आत्मा असून कांजूर येथे कारशेड केल्यास लांब पडेल. आरे कॉलनीत कारशेड केल्यास बॅटरी चार्ज करणे, गॅरेजमधून नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यामुळेच, आरेतील जागेवरच कारशेड योग्य असेल असे आयुक्तांनी सांगितले.