मुंबई :राज्याच्या राजधानीत प्रत्येक ५ व्यक्तींमागे एकाला उच्च रक्तदाब तर प्रत्येक ४ पैकी एकाला मधुमेह आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्टेप्स सर्व्हेक्षणानुसार मुंबईतील ३४ टक्के लोकांना उच्च रक्तदाब तर १८ टक्के लोकांना मधुमेह आहे. यामुळे अकाली मृत्यूचा धोका, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पक्षाघात, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. असंसर्गजन्य रोगाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी 'आरोग्यम् कुटुंबम' हा कार्यक्रम नियोजित केला आहे. असंसर्गजन्य रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मोठी व उपनगरीय रुग्णालय, प्रसूतिगृह, वसतिगृह यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
प्रगतीपथावरील कामे :दंत महाविद्यालयाच्या ११ मजली विस्तारित इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आहे. या इमारतीमधील ७ ते ११ व्या मजल्यावरील वसतिगृहाचे काम पूर्ण होत आले आहे. विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हाजी अली येथील वसतिगृह इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सायन रुग्णालयात नर्सिंग कॉलेज, नर्सिंग व निवासी वैद्यकीय अधिकारी सेवा निवासस्थाने बांधकाम तसेच सायन कोळीवाडा येथे सेवा निवासस्थान बांधकाम पूर्ण झाले. एक्वर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधकाम सुरू आहे. नायर रुग्णालय येथे लिनियर एक्सलीएटर व पेट स्कॅनच्या उभारणीसाठी एल आकाराची इमारत बांधकाम सुरू आहे. मुलुंड येथील एम टी अग्रवाल, गोवंडी येथील शताब्दी, विक्रोळी पार्क साईट येथील मोकळ्या भूखंडावर ३० खाटांचे रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ही कामे या आर्थिक वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
प्रसूतिगृहांचा विकास :शिवाजी नगर प्रसूती रुग्णालयात १२ खाटांचे नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभाग बाह्यस्त्रोतद्वारे सुरू केले जाणार आहे. मालवणी येथे ४९ खाटांची मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रसूती रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. दादर येथील जाखादेवी मंदिराजवळ बहू विशिष्ट रुग्णालय उभारले जाणार आहे. आशेवर येथे १५२ खाटांच्या प्रसूतिगृहाच्या इमारतीचे काम सुरू आहे. कामाठीपुरा येथील नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास येत आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
आपला दवाखाना :प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले आहेत. यात २ लाख ५४ हजार ९८४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत १८ अतिरिक्त पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर्स आणि १३१ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जाणार आहे. २०२२-२३ मध्ये यासाठी ७५ कोटी तर २०२३-२४ मध्ये ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.