धारावीकरांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पालिकेचे आवाहन, लवकरच शिबीर - धारावी कोरोना अपडेट
मुंबईतील सर्वात मोठे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये दोन हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
मुंबई - सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. 2 हजारांच्यावर धारावीकर कोरोनामुक्त झाले आहेत. तेव्हा या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, यासाठी आता मुंबई महानगर पालिकेनेच पुढाकार घेतला आहे. त्यानुसार प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तर प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती करण्यासाठी लवकरच धारावी शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
दाट लोकवस्तीच्या धारावीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेने विविध उपाययोजना करत तीन महिन्यात कोरोना नियंत्रणात आणला आहे. आतापर्यंत धारावी 2 हजार 492 रूग्ण आढळले असून यातील 2 हजार 95 रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीजचा अर्थात प्लाझ्माचा वापर गंभीर कोरोना रुग्णांवर केला तर तो बरा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपी वाढवण्यात आली आहे. मात्र, त्या तुलनेत प्लाझ्मा दाते पुढे येताना दिसत नाहीत. तेव्हा प्लाझ्मादाते वाढवण्यासाठी पालिकेकडूनही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता पालिकेने धारावीत ही प्लाझ्मा दानाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच धारावीत यासाठी शिबिर घेण्यात येईल. यात बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार केले जाईल आणि त्यानंतर विविध रुग्णालयात त्यांना पाठवून त्यांच्या प्लाझ्मा घेतला जाईल, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.