मुंबई -पाऊस पडून गेल्यावर काही दिवसांनी साचलेल्या पाण्यामध्ये राहिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या आजारांमध्ये डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसी सारख्या आजरांचा समावेश असून वेळेवर योग्य उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळे कोणतेही आजार अंगावर न काढता पालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी केले आहे.
मुंबईत गेला महिनाभर पाऊस पडत होता. पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली. पावसाळ्यादरम्यान व नंतर विशेष करून मलेरिया, डेंग्यु, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ, अतिसार आदी आजार पावसाळा व पावसाळ्यानंतर उद्भवतात. १ जून ते ३१ जुलैपर्यंत लेप्टोचे ६२ रुग्ण आळढले असून एकाचा मृत्यू झाला. तर डेंग्युचे २१ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर मलेरियाचे ३५१ रुग्ण आढळल्याची माहिती अश्विनी जोशी यांनी दिली.