कोकण रेल्वेच्या तिकिटांच्या काळाबाजारावर बोलताना नेतेमंडळी मुंबई:गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात फुल होत असल्याबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिले आहे. रेल्वे तिकिटांचे आरक्षण करून चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे एक मोठे रॅकेट सक्रीय आहे. यामध्ये कुठले रेल्वे अधिकारी व दलाल यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. तसेच हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे. तर दुसरीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीसुद्धा या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राणे घेणार रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक:याविषयी बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार ही कोकण रेल्वेला लागलेली कीड आहे. येत्या सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी यांची दिल्लीत भेट घेऊन घेणार असून या विषयावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या लोकांना एकदा चाबकाने सरळ करायची गरज आहे. कोकणी माणसाला पुन्हा गणेशोत्सवात गावी जाताना हा त्रास होणार नाही हे पाहावे लागणार आहे. दोषी अधिकारी व एजंट यांची आता गय केली जाणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.
कोकणातले खासदार बिनकामाचे:या प्रश्नावर आता सर्व रेल्वे संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केले आहे. हे आरक्षणाचे दुखणे दर वर्षीचे असून कोकणातले खासदारसुद्धा या प्रश्नावर आवाज उठवत नाहीत. ते फक्त बघ्याची भूमिका दर वर्षी घेत असतात. त्यासाठी आता सर्व रेल्वे संघटनांनी या प्रश्नावर एकत्र येऊन उठाव करण्याची गरज असल्याचे देशपांडे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे या आरक्षणाच्या मुद्द्यावर नाव न छापण्याच्या अटीवर रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, याबाबत नेहमी तक्रारी येत असतात; पण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही कित्येक लाखाच्या घरात असते. पण तिकिटांची संख्या मर्यादित असल्याने आरक्षण लगेच फुल होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अधिकच्या रेल्वे गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे रेल्वे अधिकारी सांगत आहेत.
चढ्या भावाने तिकिटांचे दर:गणेशोत्सवात अतिरिक्त गाड्या सोडल्या तरी त्या गाड्यांचे आरक्षणसुद्धा याच प्रमाणे मिनटात फुल होणारे असेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न दिनकर सुर्वे या कोकणवासीय प्रवाश्याने विचारला आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल करून दलाल तिप्पट भावाने कोकणवासीयांकडून तिकिटांचे दर आकारत असतात. तीनशे ते चारशे रुपयांचे स्लीपर कोच चे तिकीट हजार ते दीड हजार रुपयांना विकले जाते. तर थ्री टीयर, टू टीयर श्रेणीचे ११०० ते १३०० रुपयांचे तिकीट हे तीन ते चार हजार रुपयांना विकले जाते.
असे आहेत तिकिटांचे दर:मुंबईहून कोकणात रत्नागिरी येथे जाणाऱ्या काही ठराविक महत्त्वाच्या गाड्या व त्यांचे तिकीट दर जाणून घेऊया.
1) गाडी क्रमांक २०१११ कोकण कन्या एक्सप्रेस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते रत्नागिरी यामध्ये तिकीट दर स्लीपर कोच २९५ रुपये, थ्री टीयर एसी ७६५ रुपये, टू टीयर एसी १०६५ रुपये असे तिकिटांचे दर आहेत.
2) गाडी नंबर १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस. लोकमान्य टिळक ते रत्नागिरी यासाठी तिकिटांचे दर स्लीपर २८५ रुपये, थ्री टीयर एसी ७४० रुपये, टू टीयर एसी १०३० रुपये आहेत.
3) गाडी नंबर १०१०३ मांडवी एक्सप्रेस. छत्रपती शिवाजी टर्मिनल ते रत्नागिरी, तिकिटांचे दर स्लीपर २६५ रुपये, थ्री टीयर एसी ७२० रुपये, टू टीयर एसी १०२० रुपये आहेत.