मुंबई: तक्रारदार अमेय गावडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, त्यांच्या इमारतीच्या आवारात इमारतीत लिंबू उतारे पडलेल्या अनेकदा दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या दरवाजात देखील मीठ, मोहरी टाकल्याचा संतप्त प्रकार घडला होता. या प्रकारानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर आता बोरिवली पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार देण्यात आली आहे. बोरिवली पोलीस ठाणे याची दखल घेईल आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
उल्टा चोर कोतवाल को डाटे: अमेय गावडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, घडलेला सगळा विचित्र प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. मात्र, बिल्डिंगच्या सेक्रेटरीने त्यांना सीसीटीव्ही फूटेज दाखविण्यास नकार दिला. यानंतर तक्रारदार गावडे यांनी स्वतःचे सीसीटीव्ही लावले यामध्ये कुंडीभोवती मंत्रोपचार होत असल्याचे दिसत आहे. यानंतर कुंडीवरून झालेल्या वादातून सेक्रेटरी गावडे यांच्या अंगावर धावत आला आणि त्यांना धमकावले. सेक्रेटरी अमेय गावडे यांना म्हणाला, तू जास्त बोललास तर मी तुझ्यावर ॲक्शन घेईल आणि वरून प्रेशर आणेन.
आता पोलीस म्हणतात, कारवाई करतो:सेक्रेटरीच्या धमक्यांना घाबरून इमारतीतील इतर लोक काहीही बोलायला तयार नाहीत. मीठ, मोहरी नाहीतर रेती पडलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराने इमारतीत सुरू असलेल्या अंधश्रद्धेचे प्रकार कमिटीला वारंवार निदर्शनास आणून दिले, असे पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. माझ्या घरात लहान मुले आणि वयोवृद्ध माणसे आहेत. त्यामुळे पेणकरांनी केलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असे अमेय गावडे यांनी सांगितले. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी हे पत्र आम्हाला प्राप्त झाले असून या प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.