मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिन्याभरात दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यात येत आहेत. दोन कार्यक्रमांचे उद्घाटन ते करणार आहेत. मुंबईत भेंडीबाजारातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या मंगळवारी काही कामांची पायाभरणी केली होती. यावेळी ते सय्यदनां व अन्य मौलवींसमवेत बराच वेळ होते. मुस्लिम व ख्रिश्चन मतदार मुंबई व अन्यत्रही ठरवून भाजपविरोधात मतदान करतात. मुंबई महापालिका आणि पुढील निवडणुकीतही मुस्लिम मते ही महत्वाची आहेत. ती आपल्याला मिळाली नाहीत, तर किमान विरोधात जाऊ नयेत, यादृष्टीने भाजपने पायाभरणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत अंधेरी पूर्वेत, मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल्जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करणार आहेत.
मुस्लिम मतांवर लक्ष्य: आगामी मुंबई महापालिका आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मराठी मुस्लिम संकल्पनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि मुस्लिम मते आपल्याकडे आकर्षित झाली नाहीत, तर किमान विरोधात जाऊ नयेत, यासाठी भाजपने आता व्यापारी व कष्टकरी मुस्लिमांवर लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान मोदी बोहरा समाजाच्या शिक्षण संस्थेच्या उद्घाटनासाठी आज मुंबईत येत आहेत. तर कट्टरपंथी नसलेल्या मुस्लिम समुदायाबरोबर जवळीक व सौहार्द वाढविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
मुस्लिमांच्या खऱ्या प्रश्नांना डावलले:मुंबईतील मुस्लिमबहुल इलाख्यात महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळत नाही. केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचा अप्रत्यक्ष अजेंडा राबविणारे सरकार असून, गेल्या ९ वर्षात मुस्लिमांच्या खऱ्या प्रश्नांना डावलले गेल्याची या समाजात भावना आहे. उच्च शिक्षण, आरोग्य सुविधा, नोकऱ्या, मालकी हक्काचे घर, भाडे तत्वावरील सदनिका मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी आहेतच. अलिकडच्या काळात कोणताही राजकीय पक्ष मुस्लिमांच्या खऱ्या प्रश्नांच्या बाजूने उभा राहिलेला दिसत नाही. अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया मुस्लिमांमध्ये ऐकायला येते. बहुसंख्य मुस्लिम हे मुंबईत सर्वदूर विखुरलेल्या झोपडपट्ट्यात राहतात. शिक्षण प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी मुस्लिम समुदायाची वर्षानुवर्षाची आहे. परंतु कुठलेच सरकार या मागणीवर गंभीर नाही असे दिसून आले आहे.