मुंबई - महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्याच पद्धतीत उत्तर दिले. आता महिला सुरक्षेच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून राज्यातील महिला सुरक्षेचे धिंडवडे काढल्याचा ठपका मुख्यमंत्र्यांवर या महिला आमदारांनी ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील सावित्रीच्या लेकींचे गाऱ्हाणं मुख्यमंत्री ऐकणार का? असा सवाल या महिला 12 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.
पत्रात काय?
आता कोरोनाचे निर्बंध बरेचसे शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहात असल्याने आपणही मंत्रालयातील कार्यालयात रुजू झाला असाल या अपेक्षेने आम्ही, महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकी आपणास हे पत्र मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठवत आहोत. राज्याची कायदा सुव्यवस्था, महिलांची आणि एकूणच जनतेची सुरक्षा हा संपूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असतो, हे आपणास माहीत आहे. माननीय राज्यपाल महोदयांना लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख आपण केल्याचे आढळते. परंतु, कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय राज्याच्या गृहखात्याशी संबंधित असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी त्याचा संबंध नाही असे आपण अन्य एका संदर्भात स्पष्ट केल्याचा उल्लेख गृहखात्याने केल्याच्या बातम्या प्रसृत झाल्यामुळे, राज्यात रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत आणि दिवसागणिक महिलांवर सुरू असलेल्या तालिबानी अत्याचारांबाबत आपणास वा आपल्या कार्यालयास त्याची नेमकी कल्पना असेल किंवा नाही याबाबत आम्ही साशंकच आहोत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असल्याची कबुली आपण माननीय राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून दिली असली, तरी साकीनाक्यातील त्या दुर्दैवी पाशवी अत्याचारानंतरही मुंबईपलीकडेदेखील असलेल्या महाराष्ट्रात त्यानंतर घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असे दिसते.
परभणीमध्ये एका अल्पवयीन कन्येवर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर या लेकीने अत्यंत वैफल्यग्रस्त होऊन विष घेत आपले आयुष्य संपविले. हे गृहखात्यामार्फत आपल्या कार्यालयास कळविले गेले असेलच. आपण म्हणता त्याप्रमाणे अशी गुन्हेगारी काही एकट्या महाराष्ट्रात नाही. अन्य राज्यांतही ती आहे. पण आपण त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे याचा अभिमान बाळगावा, अशी ही स्थिती खचितच नाही. नापासांच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण संपादन करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा पळपुटेपणा पुन्हा अशा प्रकरणांतही दाखवावा ही आम्हा शिवरायांच्या महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींसाठी लाजीरवाणी बाब आहे. देशाच्या अन्य राज्यांतही गुन्हेगारी आहे, हे आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही हे आम्ही आपणास हतबलपणे निदर्शनास आणून देत आहोत.