मुंबई : भाजपाच्या महाराष्ट्रातील आमदारांकडे तेलंगाणा आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांतील निवडक विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. या आमदारांनी आपल्या 7 दिवसांच्या मुक्कामात मध्य प्रदेश तसंच तेलंगाणामधील वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. भाजपाच्या केंद्रीय समित्यांचे सदस्य हेसुद्धा दौऱ्यावर होते. त्यांनीसुद्धा महाराष्ट्रातील आमदारांना वेगवेगळ्या विषयांत मार्गदर्शन केलं. मध्यप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यातील दौऱ्यावर असलेल्या आमदारांच्या हालचालींवर वरिष्ठ नेतृत्व ॲपच्या मदतीने लक्ष ठेवून होतं.
लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न: दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील आमदारांचा दिवस सकाळी ९ वाजल्यापासून सुरू व्हायचा. पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयातून त्यांना दैनंदिन कार्यक्रमही दिला असायचा. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी त्यांना करावी लागायची. यामध्ये भाजपाच्या बूथ प्रमुखांच्या बैठका घेण्याबरोबरच काही बूथ प्रमुखांच्या घरी भेट देणं, रॅली काढणं, तेथील व्यावसायिकांशी संवाद साधणं, त्यांच्यासोबत भोजन अथवा नाश्ता घेणं, युवकांशी संवाद साधनं, तेथील समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणं यांचा समावेश होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळात जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं याला फार महत्त्व होतं. मध्यप्रदेश सरकार जरी आपलं असलं तरीसुद्धा कुठल्या मुद्द्यावर आपण कमी पडतो. विरोधकांनी लावून धरलेले मुद्दे कुठले आहेत. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कुठले आहेत, ते कसे सोडवता येतील याचा विचार करायचा होता. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या विरोधातील मुद्दे कोणते आहेत, कुठले मुद्दे हे निवडणुकीत कळीचे ठरू शकतात. या सर्व बाबींचा ‘फीडबॅक’ सुद्धा आमदारांनी पक्षाकडे दिला आहे.