मुंबई- भाजपा नेते आणि मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दुःखद निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, 'मेरा काम ही मेरी पहचान”आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत या त्यांच्या ब्रीदवाक्याला साजेसे त्यांनी कार्य केले. नगरसेवक ते आमदार अशी जवळजवळ ४० वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आमदार सरदार तारासिंह मुलुंड , भांडूप पवई , आदी विभागात तळागळातील नागरिकांच्या दांडग्या संपर्कातील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरदार तारासिंग यांची प्रकृती खालवली होती त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या प्रकृती बाबत काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर मेसेज व्हायरल होत होते. दरम्यान आज लिलावती रुग्णालय प्रशासनाने अधिकृत माहीती देत सरदार तारासिंग यांचे निधन झाल्याचे कळविले आहे.
दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या तारासिंग यांनी वडिलांपासून प्रेरणा घेत समाजकार्यात झोकून देत काम करण्यास सुरुवात केली. पुढे भारतीय जनता पक्षातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. तीन टर्म नगरसेवक व चार टर्म आमदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास झालेल्या तारासिंग यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र उतारवयाचे कारण देत पक्षाने उमेदवारी नाकारली. इतर पक्षातील दिग्गजांसहीत अनेक मंडळींशीची त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते सुधार समिती, स्थायी समिती, आरोग्य विभाग अध्यक्ष अशा विविध समित्यांचे सदस्य होते आणि त्यांनी पाच वर्षांपासून महापालिकेमध्ये महापौर आणि भाजपा गटनेते म्हणून काम पाहिले होते. आपल्या कार्यकाळात त्यांना तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर कडून सर्वोत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार मिळाला होता.
सरदार तारा सिंग हे 1999 साली म मुलुंड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीला उभे राहीले होते.दरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला 35000 मतांनी पराभूत करून आमदार झाले होते. आमदार झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तारासिंग यांनी आपल्या आमदार निधीतून आपल्या मुलुंड विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण करत या मतदार संघात आपला आगळावेगळा ठसा उमटवला होता.
भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन - Tarasingh death news
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे आज निधन झाले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखरेचा श्वास घेतला.
भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी वाहिली श्रद्धांजली-
मेरा काम ही मेरी पहचान"आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत या त्यांच्या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत राहणारे नगरसेवक ते आमदार अशी जवळजवळ ४० वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. यावर ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच प्रार्थना' असं किरीट सोमय्या यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ४३३५ कोटी रु.च्या गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा व बँकेचे तत्कालीन संचालक रणजित सिंग यांना अटक केली होती. मुलाच्या या अटकेने तारासिंग काही दिवसांपासून खूप दुःखी होते. तसेच ते आजारी देखील होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच तारसिंग यांचा निधनाची अफवा होती, पण त्यावेळी भाजप नेत्यांनी रुग्णालयात भेट देत त्यांची प्रकृती गंभीर आहे, उपचार सुरू आहेत. मृत्यूची अफवा पसरवू नये, असे सांगितले होते. मात्र, आज भाजपच्याच नेत्यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली.