मुंबई - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे राज्यात आजघडीपर्यंत १ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. हे सरकारचे अपयश आहे. यामुळे राज्यपालांनी महाविकास आघाडीला नारळ देत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. आज राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. या भेटीनंतर काही तासांमध्येच नारायण राणे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनाला पोहोचले. कोश्यारी यांच्या भेटीनंतर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
राणे म्हणाले, 'राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. राज्य सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरली आहे. दिवसागणिक ही परिस्थिती गंभीर होत आहे. आतापर्यंत १ हजाराहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालये लष्कराच्या ताब्यात देण्यात यावी. राज्य सरकारमध्ये परिस्थिती पेलवण्याची क्षमता नाही. त्यामुळे या सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.'