मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा उलघडा सुरू असताना आता सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सलानीच्या आत्महत्येसंदर्भात आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. दिशाचा प्रियकर रोहन रायने सीबीआयला सत्य सांगितले नाही, तर मी ते सत्य सीबीआयला सांगेन, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. असा गौप्यस्फोट त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
८ जून रोजी जूहू येथे एक पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये एक मोठा बिल्डर, दोन अभिनेते, एका अभिनेत्रीचा भाऊ आणि एक मोठा नेता उपस्थित असल्याची माहितीदेखील माझ्याकडे आहे. याच पार्टीच्या दिवशी रात्री दिशाचा मृत्यू झाला. त्यामुळे दिशाने आत्महत्या केली असेल तर रोहन, त्याचे मित्र, शेजारी आणि सुरक्षा रक्षक एवढे घाबरून का आहेत?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -कंगनावर बोलता तसे चार वाक्ये कोविडवर बोला, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
दिशासोबत 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणारा रोहन राय जे पुरावे लपवत आहे, ते माझ्याकडे आहेत. रोहनने सीबीआयला सत्य सांगितले नाही, तर मी सत्य सांगेन, असे सांगत नितेश राणे यांनी दिशासोबत राहणारा रोहन गायब का आहे? असा प्रश्न मुलाखतीतून उपस्थित केला. दिशा खाली पडली, तेव्हा रोहन तिथे २५ मिनिटांनी का आला? दिशाला पार्टीत बोलविण्यात आले पण तिला पार्टीत जायचे नव्हते, अशी देखील माहिती माझ्याकडे आहे, असे राणे यांनी म्हटले आहे.
रोहन तू मुंबईत ये, मी तुला संरक्षण देईन. तू घाबरू नकोस, सीबीआयला सर्व काही खरे सांग, असे त्यांनी रोहन रायला मुलाखतीत आवाहन केले. तसेच रोहन रायची चौकशी केल्यास सत्य सर्वांसमोर येईल, असे नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा -राज्यात २४ तासात १७ हजार नवे कोरोनाबाधित, ५१५ बाधितांचा मृत्यू