मुंबई - महानगरपालिकेच्या वैधानिक, विशेष नंतर प्रभाग समितीच्या निवडणुका होत आहेत. मंगळवारी पालिकेच्या एस आणि टी विभाग प्रभाग समितीची निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना समर्थक अशा दोघांकडे समसमान मते होती. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र, भाजपाचे एक मत बाद झाल्याने शिवसेनेच्या दिपमाला बडे या विजयी झाल्या आहेत. तर या निवडणुकीत महापौरांनी चिटणीस विभागाच्या मदतीने घोळ केल्याचा आणि पालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजपाने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
निवडुकीनंतर भाजपा आणि शिवसेना पदाधिकारी प्रतिक्रिया देताना. मुंबई महापालिकेच्या 17 प्रभाग समित्या आहेत. त्यापैकी मुलुंड, भांडुप येथील एस आणि टी विभागाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होती. त्यासाठी भाजपाकडून जागृती पाटील तर शिवसेनेकडून दिपमाला बडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या प्रभाग समितीमध्ये भाजपाचे 10, शिवसेनेचे 8, काँग्रेस 1 तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य आहे. प्रभाग समिती निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना आणि इतर पक्ष असे समीकरण होते.
भाजपाला प्रभाग समितीच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेनला मतदान केले आहे. आजच्या निवडणुकीतही काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसनेच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र, भाजपाचे एक मत बाद झाल्याने शिवसेनेच्या दिपमाला बडे या 10 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या जागृती पाटील यांना 9 मते मिळाली.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचे जास्त सदस्य असतानाही एक मत बाद झाल्याने भाजपापासून पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोणाचे मत बाद झाले, याची माहिती मागण्याचा प्रयत्न भाजपा नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापौरांनी काहीही न बोलता महापौर सभागृहाबाहेर गेल्या. चिटणीस असलेल्या संगीता शर्मा याही काहीही न सांगता निघून गेल्याने भाजपाने महापौर आणि चिटणीसांवर पळून गेल्याचा आरोप केला आहे.
लोकशाहीला काळीमा फासणारा दिवस -
लोकशाहीला काळीमा फासणारा आजचा दिवस आहे. पीठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणती मतपत्रिका बाद झाली हे न दाखवता थेट निर्णय जाहीर केला. त्या ताबडतोब मुख्यालयाबाहेर निघून गेल्या. तसेच एक मत अवैध आहे, असे सांगणाऱ्या चिटणीसही त्यांच्या कार्यालयाला कुलूप लावून निघून गेल्या. त्यावरून ही मिलीभगत आहे हे सिद्ध होत आहे. समसमान मते होती. चिठ्ठी टाकून निकाल लागला असता तर आम्ही तो मान्य केला असता. मात्र, अशा पद्धतीने लोकशाहीचा खून करून एक मत बाद झाले, असे सांगून निकाल जाहीर करणे म्हणजे लोकशाहीला काळीमा फासण्यासारखे आहे, असे खासदार आणि भाजपाचे नगरसेवक मनोज कोटक यांनी म्हटले आहे. मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस म्हणून आजच्या दिवसाची नोंद होईल, अशी टीका भाजपाने केली आहे.
मुंबईच्या महापौरांनी आणि महापालिकेच्या चिटणीस यांनी हातमिळवणी करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. कोणत्याही निवडणुकीत पीठासीन अधिकारी निवडणुकीत असलेल्या आक्षेपाचे निरसन करून जातात. कोणत्या नगरसेवकाचे मत बाद ठरले आहे हे पाहण्यासाठी आम्ही मागणी करत होतो. मात्र, आम्हाला शेवटपर्यंत मतपत्रिका दाखविण्यात आली नाही. महापौर लगबगीने निघून गेल्या आणि चिटणीसही त्यांच्या दालनाला लॉक लावून निघून गेल्या. महापौर निवडणूक प्रक्रियेतसुद्धा कशा वागतात हे महापालिकेच्या इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले जाईल. आम्ही त्यांचा निषेध करतो, असे भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडली आहे. निवडणुकीची व्हिडिओ शूटिंग करण्यात आली आहे. फोटो काढण्यात आले आहेत. ते आरोप करणाऱ्यांनी बघायला हवेत. त्यात कोणाचे मत बाद झाले, हे त्यांना कळेल, असे विजयी उमेदवार दिपमाला बडे आणि भांडुप येथील आमदार व नगरसेवक सुरेश कोरगांवकर यांनी म्हटले आहे.