महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 5, 2020, 5:13 PM IST

ETV Bharat / state

'आम्हाला सांगण्यापेक्षा शिवसेनेनं आत्मचिंतन करावं'

हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेने आम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देण्यापेक्षा स्वत: आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी टीका राम कदम यांनी केली.

राम कदम
राम कदम

मुंबई - भाजपा नेते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेने आम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देण्यापेक्षा स्वत: आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे राम कदम म्हणाले. तसेच फार मोठा अनुभव असलेले राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करतात. दुसरीकडे त्याच काँग्रेसबरोबर वाटाघाटी करून सरकार चालवत आहेत. काय विडंबना आहे ही, अशी टीका भाजपा नेते राम कदम यांनी केली. अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका केल्याचे राम कदम म्हणाले.

राम कदम यांची शिवसेनेवर टीका

पप्पू कोण आहे, असा प्रश्न केला असता, एकाच व्यक्तीचे नाव पुढे येते. आपण डोळ्यावर पट्टी बांधून किती दिवस एका कुटुंबाच्या पाठीमागे धावणार आहोत. देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी डोळ्यावरची पट्टी कधी उतरवणार आहेत, असे राम कदम म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनादेखील आमचा सवाल आहे, की तुमची तीन पक्षांची भांडण कधी संपणार आहेत. तुमच्या भांडणामुळे विकास ठप्प झालाय. तो कधी सुरू होणार, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेने आत्मचिंतन करावं -

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंहासनासाठी सोडून दिले. त्यामुळे आम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देण्यापेक्षा शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली, तर मी शिवसेना बंद करेन, या बाळासाहेब ठाकरे यांच्या वाक्याचा शिवसेनेला विसर पडला आहे, असेही राम कदम म्हणाले.

तीन पक्षातील भांडण मिटवा -

थापा मारण्यापेक्षा, पक्षातील भांडण मिटवण्याचे प्रयत्न करा. बदल्यांच्या पलीकडे तुमचं सरकार काम करत नाही. तुमचे मंत्री बंगल्याच्या बाहेर पडून काम करायला तयार नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही आतापर्यंत कोणतीही मदत केली नाहीत, ते कधी करणार ? यावर बोला, असा सवालही त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details