मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजप शिवसेनाचा कलगीतुरा सुरू झाला आहे. शनिवारी एम्स फॉरेन्सिक टीमचे चेअरमन डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी आपला अंतिम रिपोर्ट सीबीआयकडे दिला. त्यानुसार सुशांत सिंगचा मृत्यू आत्महत्येने झाला आहे हे सिद्ध झाले. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून एका कलाकाराच्या आत्महत्येचे राजकारण करून मुंबई पोलीस व महाराष्ट्राची खोटी बदनामी करणाऱ्यांवर निशाणा साधला. त्यावर राम कदम यांनी देखील शिवसेना नेते आणि सामनाकार राजकारणाच्या स्वार्थापोटी हिंदू धर्माचे संस्कार विसरले असल्याची टीका केली आहे.
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयचा तपास अजून पूर्ण झाला नाही, त्याच्या आधीच आत्मसाक्षतकाराचे आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेते चौकशी पूर्ण होण्याआधिच निष्कर्षापर्यंत येतात, याचं आश्चर्य कमी पण, त्यांना कुणाला वाचवायचं आहे? हा प्रश्न अधिक पडतो असे राम कदम म्हणाले आहेत.
स्वार्थापोटी हिंदू संस्कार विसरलेली शिवसेना कोणाला वाचवतीय? सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता. आयुष्याची उताराला लागलेली गाडी त्याला सावरता येत नव्हती. त्या धडपडीत तो भयंकर अशा अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेला व एक दिवस गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे करतच होते. मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस दल आहे, पण मुंबई पोलीस लपवाछपवी करीत आहेत, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा धुरळा उडवला. मात्र, सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे, अशी टीका केली होती.
शिवसेनेच्या या अग्रलेखी टीकेवर भाजप नेते राम कदम यांनी बोचरी टीका केली आहे. सामनाकार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि सुशांतच्याया कुटुंबाला बदनाम आणि अपमानित करण्याची सुपारी घेतल्याच दिसतय ? 74 वर्षाच्या म्हाताऱ्या सुशांतच्या वडिलांना आणि कुटुंबीयांना वारंवार शिवसेना नेत्यांनी अपमानित केले असल्याची टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
देवाघरी गेलेल्या सुशांतला मेल्यानंतर सुद्धा शिवसेना नेते बरे वाईट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. हे अत्यंत वाईट शब्दात अपमानित करतात. मृत्यूनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये, हा हिंदू धर्मातला संस्कार सामनाकार शिवसेना नेते, राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले असल्याची टीकाही कदम यांनी केली ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.