आता वेळ न घालवता मुंबई पालिकेची निवडणूक घ्या - भाजपची मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचना २२७ असावी कि २३६ असावी याबाबत उच्च न्यायालयाने निकाल देत २२७ प्रभागांवर शिक्कामोर्तब केले आहे. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत असल्याचे याचिकाकर्ते राजू पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यावर भाजप नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
पालिकेच्या प्रभागांवरून वाद: मुंबई महानगरपालिकेचा पाच वर्षाचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ मध्ये संपला आहे. पालिकेवर ८ मार्च २०२२ पासून गेले वर्षभर आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ९ प्रभाग वाढवून २३६ प्रभाग करण्यात आले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकस आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर मुंबई महानगर पालिकेचे २२७ प्रभाग असतील असा निर्णय सरकारने घेतला. त्याला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका सोमवारी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशी माहिती राजू पेडणेकर यांनी दिली.
निवडणुका नोव्हेंबर दरम्यान :मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील यासाठी याआधी २३६ प्रभाग रचनेनुसार मे २०२२ मध्ये ओबीसीचा समावेश न करता प्रभाग आरक्षण काढण्यात आले होते. त्यानंतर ओबीसी आरक्षणासह जून २०२२ मध्ये प्रभाग आरक्षण काढण्यात आले होते. हे दोन्ही प्रभाग आरक्षण आता रद्द झाले आहेत. २२७ प्रभाग रचनेनुसार नव्याने सीमांकन कराने त्यासाठी हरकती व सूचना मागवाव्या लागणार आहेत. नव्याने प्रभाग आरक्षण काढावे लागणार आहे. २२७ प्रभागांनुसार मतदार याद्या बनवाव्या लागणार आहेत. यासाठी सुमारे पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात दिवाळी दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे.
फाटे न फोडता निवडणुका घ्या: न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कोणताही आधार नसताना प्रभाग रचना करण्यात आली होती. भाजपाने त्या विरोधात हरकत घेतली, आंदोलने केली. पालिका आयुक्तांचे आम्ही त्यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले होते. न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमची भूमिका न्यायालयाने मान्य केली आहे. आता या प्रक्रियेला कोणतेही फाटे न फोडता निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोग पालिका निवडणूक कधी घेते, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:Bawankule Criticism Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंना सत्तेचे व्यसन बावनकुळेंची टीका