मुंबई Nitesh Rane On Rahul Gandhi : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण पेटलेलं असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना सुद्धा ते उपोषणावर ठाम आहेत. अशात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. या मुद्द्यावर बोलताना भाजपा आमदार, नितेश राणे यांनी सांगितलं आहे की, हे करण्यापेक्षा राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आतापर्यंत जरांगे पाटलांना फोन का नाही केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ते बोलत होते.
मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट का : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांचं म्हणणं आहे की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळ राष्ट्रपती यांना भेटणार आहे. ते मराठा आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारला लक्ष घालायला सांगणार आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरती बोलावं. मग उठसूठ तुम्ही मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट का दाखवता? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांची भूमिका काय आहे? राहुल गांधी यांनी याबाबत साधं एक ट्विट तरी केलं आहे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.