मुंबई :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यासंदर्भात गुरूवारी रात्री उशिरा कोलई, रेवदंडा पोलीस स्टेशन, रायगडमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती भाजप नेते सोमैय्या यांनी दिली आहे. किरीट सोमैय्या हे सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत. त्यांना आता यामध्ये यश आल्याचे दिसून येत आहे. 1 जानेवारीला 19 बंगल्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले कुठे गेले? असा सवाल पत्रकार परिषदेत विचारला होता.
अखेर गुन्हा दाखल :याविषयी बोलताना किरीट सोमैय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे परिवाराचा १९ बंगले घोटाळ्यासंदर्भात कोलई येथील रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्यांविरुद्ध फसवणूक, संगनमत करून १९ बंगल्यासंदर्भात रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, चीटिंग करणे या प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आता उद्धव ठाकरेंना हिशेब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमैय्या म्हणाले आहेत.