मुंबई - राष्ट्रवादीकडून प्रचारासाठी सोमय्या यांच्या व्हिडिओचा वापर होत आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, कारवाईची मागणी केली आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारुन मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले आहेत.
ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध होता. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना प्रचार करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत यांनी निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडून प्रचारासाठी किरीट सोमय्यांच्या व्हिडिओचा वापर आता 'भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करू शकतो' असे किरीट सोमय्या बोलल्याचा व्हिडीओ वापरून संजय पाटील प्रचार करत असल्याची तक्रार सोमय्या यांनी ईशान्य मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यात पाटील मतदारांची दिशाभूल करत आहेत. या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याने किरीट सोमय्या हे नाराज झाले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे भांडुप पश्चिम येथील आमदार अशोक पाटील यांनी भावी खासदार म्हणून राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांचा उल्लेख केला होता. आमदार सुनिल राऊत यांनीही अशाच प्रकारचा उल्लेख केल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली होती. अखेर याबाबत आमदार सुनिल राऊत यांना आम्ही युतीमध्येच असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते.