महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फडणवीसांच्या दिल्लीतील गाठी-भेटी सुरूच; मोदी-शाह यांच्या भेटीनंतर आज भाजपाध्यक्षांना भेटणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान मोदींना यांना माहिती दिली. मोदी- शाह यांच्या भेटीनंतर फडणवीस आज भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

devendra-fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jul 18, 2020, 10:56 AM IST

मुंबई- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपल्या शिष्टमंडळासह दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. याच कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांच्या भेटीगाठी अद्याप सुरूच आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (शनिवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. राज्यात ऑपरेशन कमळची गरज नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले असले तरीही, आज नड्डा यांच्या भेटीत राज्यातील राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

देंवेद्र फडणवीस हे शुक्रवारी भाजपच्या काही लोकप्रतिनिधींसोबत दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी गृहमंत्री शाहसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली. याभेटी बाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याच्या विरोधी पक्षनेता म्हणून जनतेची दुःख आणि भावना मांडने हे कर्तव्य आहे, या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या कोरोना स्थितीची माहिती दिली.

कोरोना काळात महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला आहे. या दौऱ्यादरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणांशी पंतप्रधानांना अवगत केले, असेही फडणवीस म्हणाले.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि राज्यातील उपाययोजनांची स्थिती काय आहे, याबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र सरकार आधीपासूनच महाराष्ट्र सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करीत आहे. यापुढे ही केंद्राचे सहकार्य असणार आहे. या भेटी दरम्यान पंतप्रधानांनी मुंबई, पुणे, मराठवाडा तसेच विदर्भातील परिस्थितीही जाणून घेतली. सरकारच्या कामकाजातील उणीवा त्यांच्या निदर्शनात आणून देणे आवश्यक आहे. तज्ज्ञ तसेच डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्या बाबतीत सुधारणांची आवश्यकता आहे, यासंबंधीची माहिती ही पंतप्रधानांना दिली. रुग्ण संख्या कमी कशी करता येईल, यावरही चर्चा झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस

दिल्लीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. याच प्रमाणे मुंबईत तपासण्यांचे प्रमाण वाढवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मुंबईसह राज्यातील इतरत्र भागातही तपासण्या वाढवण्याची विनंती भेटीदरम्यान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


शुक्रवारच्या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली असून साखर उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली . केंद्र सरकार साखर उत्पादकांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. आज ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details