मुंबई -राज्यात पुन्हा भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत चर्चेला उधाण आले आहे. शुक्रवारी (6 ऑगस्ट) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती सक्रिय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळे राज ठाकरे मराठी विरुद्ध परप्रांतीयांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? असा प्रश्न आता या भेटीनंतर उपस्थित झाला आहे.
20 दिवसात पाटील-ठाकरेंची दुसरी भेट
गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. आज चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. तर ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मागील २० दिवसात या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट आहे.
काही शंका होत्या त्या दूर केल्या - पाटील
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे भाजप- मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण आले. तर, 'युतीचा कोणताच प्रस्ताव या बैठकीत नव्हता. हे दोन पक्ष एकत्र येवून निवडणुका लढवतील असा कुठलाच विचार आता नाही. राज ठाकरे यांचे बोरवली येथे झालेले भाषण मी ऐकलं आहे. तरी काही शंका होत्या, त्या दूर करण्यासाठी आलो होतो. दोन भूमिका असतात. माणूस म्हणून त्यांना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यांचं म्हणणं आहे की उत्तर भारतात ८० टक्के नोकऱ्या तेथील लोकांना मिळाल्या पाहिजेत, तशा त्या महाराष्ट्रात पण मिळाल्या पाहिजेत. हे जे तुम्ही म्हणता ती त्यांची भूमिका योग्य आहे. पण जेंव्हा ते बोलतात त्यात उत्तर भारतीयांना कटुता असल्यासारखे वाटते', असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले.
परसेप्शन बदलले पाहिजे - पाटील
'मी त्यांना म्हणालो, की हे परसेप्शन बदलले पाहिजे. लोकांना कटुता आहे असे वाटते. तुम्ही तुमची भूमिका व्यापक करावी असे मी त्यांना सांगितले आहे. या दोन वर्षात मला लोकांपर्यंत जाता आले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी मला समजवलं. पण आता त्यांना या गोष्टी व्यवहारात आणाव्या लागतील', अशी चर्चा झाल्याचेही पाटलांनी सांगितले.