मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी चहा विकल्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतात. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून खोचक टोला लगावला होता. राजकारणात चहा विकल्याचे भांडवल केले जाते, असे ते म्हणाले होते. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून 'छत्री असूनही पावसात भिजल्याचं भांडवल केलं जातंच की', असे म्हणत त्यांना प्रतिटोला हाणला आहे.
राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केले
रोहित पवार हे मंगळवारी बारामतीतील एका चहाच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यांनी दुकानाच्या उद्धाटनाचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करतानाच रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केले जाते. पण, आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी 'खासदार' तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी 'आमदार' या नावाचेच चहाचे हॉटेल सुरू केले. त्यांचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या, असे ट्विट त्यांनी केले होते.
या ट्विटवरून बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरूनच या टोल्यावर प्रतिटोला लगावला आहे. 'राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं; रोहित पवारांचा खोचक टोला... छत्री असूनही पावसात भिजल्याचंही भांडवल केलं जातंच की...', असे ट्विट त्यांनी केले आहे.