मुंबई:राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगला आहे. राणा दांपत्याला झालेली अटक आणि सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप नेतेही यावरून आक्रमक झाले असून शिवसेनेची गुंडगिरी सुरू आहे, शिवसेनेला जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. त्यातच आता भाजपचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. महाविकास आघाडी आणि पोलिसांविरोधात तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या शिष्टमंडळात आमदार मिहीर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शहा, आमदार राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैय्या यांचा समावेश आहे. ते दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतील. शनिवारी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाल्याचा दावा सोमैय्या यांनी केला होता. ट्विट करत त्यांनी, "शिवसेनेच्या गुंडांनी जोरदार दगडफेक केली, माझ्या कारच्या खिडकीची काच फोडली, मी जखमी झालो, वांद्रे पोलिस स्टेशनला धाव घेतली." असे म्हणले होते.