महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पक्षपात करत महापौरांनी 73 टक्के निधी दिला शिवसेनेला; भाजपचा आरोप - मुंबई भाजप बातमी

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पक्षपात करत अर्थसंकल्पीय निधीचा जास्तीत जास्त निधी हा स्वपक्षीय नगरसेवकांना देण्यात आला आहे, असा आरोप जप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.

बृहन्मुंबई महापालिका
बृहन्मुंबई महापालिका

By

Published : Aug 20, 2020, 9:44 PM IST

मुंबई - सुमारे पाच महिन्यांनी झालेल्या मुंबई महापालिकेच्या महासभेत नगरसेवक निधी वाटपाबाबत भाजप व शिवसेनेमध्ये जोरजार खडाजंगी झाली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पक्षपातीपणा करत अर्थसंकल्पीय निधीचे जास्तीत जास्त वाटप स्वपक्षीय नगरसेवकांना केल्याचा भाजपने आरोप केला. 728 कोटींपैकी 535 कोटी म्हणजे 73 टक्के निधी केवळ शिवसेना पक्षासाठी देण्यात आल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. भाजपचे नगरसेवक असलेल्या विभागावर अन्याय केला असे सांगत भाजपकडून निषेध करण्यात आला.

बोलताना भाजपचे गटनेते शिंदे

मुंबई महापालिकेत तब्बल पाच महिन्यानंतर आज (20 ऑगस्ट) पालिका सभागृहाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. पालिकेच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे मार्चपासून पालिका सभागृहाची बैठक होऊ शकलेली नाही. शेवटची बैठक 17 मार्चला झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने प्रशासनाने बैठक आयोजित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे अर्थसंकल्पही मंजुरीविना राहिला होता.

अर्थसंकल्पाला मंजुरी न मिळाल्याने पालिकेचे आर्थिक गाडे रुतले आहे. तसेच नगरसेवकांना नगरसेवक निधी, विकास निधी तसेच महापौरांकडून विकासकामांसाठी सर्व राजकीय पक्षांना मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळू शकला नाही. त्यामुळे विभागातील नागरी सुविधांची कामे खोळंबली आहेत. दरवर्षी एप्रिलपासून हे तिन्ही निधी नगरसेवकांना वापरता येतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे तब्बल सहा महिने वाया गेले आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत महापौरांकडून विकास कामांसाठी निधीवाटप होईल, म्हणून सर्व नगरसेवक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजर होते. मात्र, शिवसेना वगळता इतर पक्षीय नगरसेवकांना, विशेषतः भारतीय जनता पक्षाला फारच कमी निधी मिळाला. याला विरोध करत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.

शिंदे म्हणाले, बैठकीच्या अजेंड्यात 358 ठरावांच्या सूचना समाविष्ठ होत्या. त्याच्यापैकी 151 ठरावांच्या सूचना आज सकाळी सदस्यांना मिळाल्या. अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी खरे तर गटनेत्यांची बैठक घेतली जाते. मात्र, महापौरांनी ती बैठकही घेतली नाही. या मागचे कारण असे की, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा निधी हा ठराविक भागामध्येच वाटप करण्याचा महापौरांचा मानस होता आणि तसेच घडले. अर्थसंकल्प निधीपैकी 73 टक्के निधी शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आला.

शिवसेनेच्या खालोखाल भारतीय जनता पक्षाचे 84 नगरसेवक आहेत. मात्र, त्यांना फक्त 13 टक्केच निधी दिला गेला आणि इतर पक्षांना 17 टक्के निधीचे वाटप करण्यात आले. म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय निधीचा जास्तीत जास्त भाग शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आला आहे. एकूण 728 कोटींपैकी 535 कोटी म्हणजे 73 टक्के निधी केवळ शिवसेना पक्षासाठी देण्यात आला आहे. महापौरांनी जवळ जवळ सर्वच निधी स्वपक्षीय नगरसेवकांना देण्यात धन्यता मानली. भाजपचे नगरसेवक असलेल्या विभागावर महापौरांनी अन्याय केला असून महापौरांचा हा पक्षपातीपणा आहे, असे सांगत त्यांनी निषेध केला.

हेही वाचा -मुंबईत वाढतोय देहव्यापार; अल्पवयीन मुली, महिलांच्या मानवी तस्करीत मोठी वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details