मुंबई -मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाली आहे. आज मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपाने लाक्षणिक उपोषण केले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर यांचाही समावेश आहे.
मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा आक्रमक; मुंबईत पोलिसांची कारवाई - महाराष्ट्र मंदिर प्रश्न न्यूज
कोरोनामुळे राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे आठ महिन्यांपासून बंद आहेत. त्याविरोधात भाजपाने राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेटिंग असूनही भाजपा आंदोलकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याशिवाय, भाजपाने शिर्डी साईबाबा मंदिर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाहेरही आंदोलन केले. त्यांनी उद्धव सरकारला राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी पुन्हा खुली करण्याची मागणी केली.
या दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातही तणावपूर्ण स्थिती आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे. एकूण राज्यातील मंदिर प्रश्नामुळे राजकीय वातावरण तापले आहे.