मुंबई :सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा भाजपने पवित्रा घेतला आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्यावरून काँग्रेस भाजपवर आक्रमक होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहे.
काँग्रेस, उद्धव ठाकरे गटात फूट :राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यामध्ये विशेष करून उद्धव ठाकरे गटात फूट पाडण्यात भाजपला यश आले. त्यानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु आता ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पुन्हा एकत्रितपणे विरोधकांची भूमिका ठामपणे बजावत असताना त्याचा धसका कुठेतरी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. यामध्ये फूट पाडण्यासाठी आता भाजप पूर्णतः प्रयत्नशील होताना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. सावरकरांबद्दल काँग्रेसची भूमिका, राहुल गांधी यांच्याकडून सतत होणारी टीका यावरून हा आयता मुद्दा हाती घेऊन शिंदे-फडवणीस सरकार महाविकास आघाडीत विशेष करून काँग्रेस, उद्धव ठाकरे गटात फूट पाडण्यासाठी पुन्हा प्रयत्नशील झाली आहे.
भाजपचा डिवचण्याचा वारंवार प्रयत्न :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसची भूमिका नेहमीच विरोधाची राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वतंत्र्यवीर सावरकर यांचा अपमानच करत आलेले आहेत. तसे पाहता राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतरसुद्धा ते सावरकरांच्या बाबतीत असलेल्या भूमिकेवर ठाम आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु या मुद्द्यावर बोलताना, भाजपला सत्तेतून पायाउतार करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. या पक्षांमध्ये जरी प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असली तरी, सुद्धाभाजप विरोधात हे तिन्ही पक्ष एक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. आताही ते तेच सांगत आहेत.