मुंबई- 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार येऊनही सरकार स्थापन करण्यात अपयश आलेल्या भाजपला ही खंत अजूनही सतावत आहे. यासाठी सर्वस्वी भाजपने शिवसेनेलाच जबाबदार ठरवले आहे किंबहुना शिवसेनाच जबाबदार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मागच्याच महिन्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौर्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह ( Union Minister Amit shah ) यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. या टीकेमध्ये प्रमुख लक्ष त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष शिवसेनेला केले आहे. शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली, भाजपशी विश्वासघात करत सत्ता स्थापन केली, असा आरोप अमित शाह यांनी केला ( Amit Shah on Uddhav Thackeray) आहे. अमित शाह यांच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on BJP ) यांनी सडेतोड उत्तर जरी दिले असले तरीही पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप वारंवार शिवसेनेला अडचणी तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सरकार पाडण्याचे प्रयत्न असफल..
महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. पण, हे सरकार लवकरच पडेल, अशा अनेक तारखा भाजप नेत्यांकडून देण्यात आल्या. पण, आता या सरकारने यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण केली आहेत. भाजप भक्कम विरोधी पक्ष नेता म्हणून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा पूर्ण प्रयत्न ते करत आहेत. विशेष करून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेवर त्यांचाकडून सतत निशाणा साधला जात आहे. मुंबई महापालिकेतही शिवसेनेची सत्ता असल्याने तिथेसुद्धा अनेक मुद्द्यांवर भाजप सतत आक्रमक होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिढा निर्माण करण्याचे प्रयत्नही यापूर्वी भाजपकडून उघडपणे किंवा छुपेपणाने झाले आहेत.
मुंबई महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र विधिमंडळ दोन्ही ठिकाणी भाजपच मुख्य विरोधी पक्ष म्हणून विराजमान आहे. सातत्याने अनेक आरोप करूनही महाविकासआघाडीमध्ये तिढा निर्माण करण्यात किंवा यातील नेत्यांना धारेवर धरण्यात भाजपला हवे तसे यश मिळत नसल्याचे दिसत आहे. म्हणूनच हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते अमित शाह...
हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि महाविकासआघाडीने एकत्र निवडणुका लढवाव्यात. भाजप दोन हात करायला तयार आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत मातोश्रीवर ठरले होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. भाजपशी विश्वास घात केला आणि ज्यांच्याशी लढायचे त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री यांनी रविवारी (दि. 19) पुण्यात केला होता.
हे ही वाचा -Amit Shah on Uddhav Thackeray :..तर राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
अमित शाहांच्या आरोपांना संजय राऊत यांचे उत्तर...
अमित शाह यांनी लावलेल्या आरोपांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. अमित शाह खोटे बोलात आहेत, असे सांगत अमित शाहांनी पुण्यात रविवारी जे काही वक्तव्य केले ते पूर्ण असत्य होते. त्यांनी नक्की काय खरे बोलले हे आम्ही शोधत आहोत. आमच्या सरकारविषयी आणि हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्र भाजपचे नेते वैफल्यात आहेत. आता भाजपचे सर्वोच्च नेतेही वैफल्यातून बोलत आहेत. सत्ता गेल्याने ते अस्वस्थ आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
2014च्या निवडणुकीवेळी शिवसेनेला दूर करा, असे कोणी सांगितले..? - राऊत
हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने कधीच सोडला नाही. 2014 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेला दूर करा, असे सांगणारे कोण होते. ते अमित शाह असल्याचे भाजप नेते आम्हाला खासगीत सांगत होते. 2014 च्या निवडणुकीवेळी आम्ही वेगळे लढलो होतो. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे यश मिळवले. 2014 पासून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण होते, असा सावल करत राऊत यांनी अमित शाहांना लक्ष्य केले.
केंद्राने प्रयत्न करूनही महाराष्ट्र सरकारचे काहीच बिघडले नाही - राऊत
डायरेक्ट टॅक्स बेनिफिट योजनेवरून ( DBT ) अमित शाहांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर हल्लाबोल केला. त्यावर बोलताना ट ला ट आणि फ ला फ आम्हालाही लावता येतो, असे आरोप आणि टीका निरर्थक आहेत, असे राऊत म्हणाले. सीबीआय ( CBI ), ईडी ( ED ) आणि एनसीबी ( NCB ) ही तीन चिलखतं काढून दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही समोरून लढतो. शिवसेना हा छातीवर वार झेलणारा पक्ष आहे. केंद्राने प्रयत्न करूनही महाराष्ट्र सरकारचे काहीच बिघडले नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना देशामध्ये काम नसेल तर आम्हाला सांगावे. कर्नाटकमध्ये शिवरायांचा अपमान होतो आहे. तिथे बघावे शिवरायांच्या पुण्यभूमीत खोटे बोलू नका. पुण्यात येऊन आम्हाला शिकवू नका, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तिन्ही पक्षांनी आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन आता आमच्याशी लढून दाखवावे, असे आव्हान अमित शाहांनी दिले होत, त्यावर बोलताना आधी तुम्ही राजीनामा द्या. 105 आमदारांना निवडून आणून दाखवा, असे राऊत म्हणाले.
काश्मिरातील हिंदूंच्या किंकाळ्याने ज्यांची मने द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने देऊ नये
काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील धुसफूस वाढत चालली आहे. शिवसेनेच्या प्रत्येक निर्णयावर किंबहुना कृतीवर भाजपकडून प्रहार केला जात आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजपकडून वारंवार केली जात आहे. त्यावरच शिवसेनेने आपली भूमिका मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केली होती. ही भूमिका स्पष्ट करताना भाजपवर सडकून टीकाही केली होती. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱ्यांनी जम्मू-काश्मिरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल का? महाराष्ट्रात शिवसेनेने काय करायला हवे आणि काय केले याचे सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवर असणाऱ्या हिंदूंचा आक्रोश समजून घ्यावा. राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा म्हणजे हिंदुत्व नाही. गोमांसावरून एका राज्यात लोकांना ठार करायचे आणि दुसऱ्या राज्यात तेच गोमांस विकायला परवानगी द्यायची. हे तुमचे हिंदुत्व म्हणजे कळसच झाला. आता हिंदुत्वावर प्रवचने देणे बंद करा. काश्मिरातील हिंदूंच्या किंकाळ्याने ज्यांची मने द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने देऊ नये, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली होती.
हे ही वाचा -Saamna Editorial : त्याच गंगेत हजारो बेवारस मृतदेह वाहताना जगाने पाहिले