मुंबई BJP and Shinde Fraction Criticize Uddhav Thackrey : शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरेगट) यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावरुन भाजपावर निशाणा साधलाय. रविवारी मिरा-भाईंदर इथं एका कार्यक्रमात बोलताना, "रामलल्ला ही भाजपाची खासगी प्रॉपर्टी नाही. रामलल्लाचं दर्शन देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे," असं उद्धव ठाकरेंनी म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गट-भाजपानं जोरदार समाचार घेत, घणाघाती टीका केलीय.
उरली सुरली सेनाही नष्ट होईल :रामलल्ला ही भाजपाची खासगी प्रॉपर्टी नाही, मुळात उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजे त्यांची श्रीरामावरची आस्था आणि श्रद्धा नसणं यातून दिसून येतंय. जर कोणी देवदर्शनासाठी मोफत दर्शन देत असेल तर त्यात चुकीचं काय? तुमच्या पक्षातील लोक देखील अनेक ठिकाणी लोकांना देवदर्शनासाठी मोफत घेऊन जातात. आता अमित शाह जर रामलल्लाचं मोफत दर्शन देऊ, असं बोलले तर त्यात चुकीचं काय? पण उद्धव ठाकरेंनी रामलल्ला ही भाजपाची खासगी प्रॉपर्टी आहे का? असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी हे वक्तव्य मागं घेतलं पाहिजे. अन्यथा त्यांची उरली सुरली सेनाही नष्ट होईल, अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी केलीय.