मुंबई - कोरोनानंतर राज्यावर बर्ड फ्लूचे संकट आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, परभणी, लातूर या ठिकाणी बर्ड फ्लू असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र याचा फटका पोल्ट्री व्यवसायीकांबरोबरच चिकन, अंडी विक्रेत्यांनाही बसला आहे. चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे आपोआप दरही घसरले आहेत. कोणत्या जिल्ह्यात चिकन आणि अंड्यांची किती मागणी आणि खप आहे, याचा घेतलेला हा आढावा.
परभणी - चिकन अंड्यांचे भाव घसरले
परभणीत पहिल्यांदा ४०० कोंबड्या मेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे निष्पन्नही झाले होते. त्या पार्श्वभूमीवर एरवी १८० रुपये किलो दराने विक्री होणारे चिकन सध्या १२० ते १४० रुपये दराने विक्री होत आहे. त्याप्रमाणे अंड्याचे भाव देखील पडले असून, एरवी साध १८० रुपयांना विक्री होणाऱ्या अंड्यांच्या एका खिस्तीचा भाव ५० रूपयाने पडून तो १३० रुपये एवढ्या दरावर आला आहे.
नाशिक- २० टक्के मागणी घटली
बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबड्यांची मागणी २० टक्के घटली आहे. दरातही घट झाली असून ९० रुपये बाजारात मिळणारी कोंबडी ही ५० रुपयांवर आली आहे. मात्र दोन दिवसापासून पुन्हा किलो मागे १० रुपये वाढ झाली असून ६५ रुपये किलो विक्री होत असल्याचे आनंद अॅग्रोचे अध्यक्ष उद्धव आहिरे यांनी सांगितले. देशातील तामिळनाडूतील पडलम जिल्ह्यानंतर नाशिक जिल्हा हा कोंबडी उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा आहे. राज्यात महिन्याकाठी सुमारे चार कोटी कोंबड्यांचे उत्पादनात घेतले जाते. त्यात निम्याहून अधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. राज्यात दिवसाला पोल्ट्री उद्योगाची सरासरी उलाढाल १४ ते १५ कोटी रुपयांची असून एकट्या नाशिक जिल्ह्याची सरासरी उलाढाल ७ ते ८ कोटी इतकी आहे. सध्या मार्गशीर्ष महिना असल्याने उपासाचे प्रमाण अधिक असल्याने दरवर्षी संक्रातीनंतर मांसहाराचे प्रमाण वाढत असल्याचे कोंबडी विक्रेते सांगतात.
कोल्हापूर - दर घटले
कोल्हापूर जिल्ह्यातील चिकन विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे. ४ दिवसांपूर्वी जवळपास १६० रुपयांपर्यंत चिकनचे दर होते. ते आता ९० रुपयांच्या सुद्धा खाली उतरले आहेत. कोल्हापूरात कोणत्याही प्रकारे बर्ड फ्ल्यूचा शिरकाव अद्याप झाला नाहीये. मात्र त्याचे परिणाम आत्ता पासूनच पहायला मिळत आहेत. कोल्हापूरात मोठ्या संख्येने चिकन विक्रेते आहेत. मटनाबरोबरच चिकन खाणाऱ्यांची संख्यासुद्धा कोल्हापूरात प्रचंड आहे. ४ दिवसांपूर्वी याच चिकनचे दर जवळपास १६० ते १८० रुपये किलो इतके होते. काही ठिकाणी तर चिकनचे दर २०० पर्यंत पोहोचले होते. मात्र जसजसा महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू दाखल झाला तसा चिकन विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापुरात तर अफवाच पसरल्याने इथल्या विक्रेत्यांना चिकन ८०-९० रुपये किलो दराने विकावे लागत आहे.
अमरावती - नागरीकांमध्ये भिती
आठ दिवसांपूर्वी १६० ते १७० रुपये पर्यंत विकला जाणारा अंड्याचा ट्रे आता १३० रुपयांपर्यंत विकावा लागत आहे. शिवाय अंड्यांची मागणीही घटली आहे. चिकन व्यवसायालाही जबर फटका बसला आहे २०० रुपये किलो विकले जाणारे चिकन आता १५० ते १७० रुपये किलो रुपयांमध्ये बाजारपेठत मिळताना दिसत आहे. राज्यात अद्यापही बर्ड फ्लू नसला तरी बर्ड फ्लू च्या भीतीमुळे मात्र पोल्ट्री व्यवसायाला फटका बसत आहे.
राज्यावर बर्ड फ्लूचे संकट
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिलेत. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्ष्यांमधील बर्ड फ्लू रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर ३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही, अशा भागात अंडी व मांस ७० डिग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नाही. त्यामुळे गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारी यंत्रणा सज्ज
पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, परभणीत ८४३ कोंबड्या, ठाण्यात बगळे व इतर पक्षी मिळून १५, रत्नागिरीत ९ कावळे यांचे बर्ड फ्लू अहवाल एच5एन1 आला आहे. तर बीड येथील ११ कावळ्यांचा अहवाल एच5एन8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपाळहून प्राप्त होणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. केंद्र सरकारच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात 7 जानेवारीपासून नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत. मृत पक्षांची माहिती घेणे सुरू आहे. पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तांना दिली.