नवी मुंबई : नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले आहे. मनसे उपशहर अध्यक्षासह पाच बड्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोठ्या आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. उपशहराध्यक्षाने अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे नवी मुंबई मनसे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
आर्थिक हितसंबंधांमुळे राजीनामा :नवी मुंबई मनसे शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्यासह 5 पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र करत पक्षीय पद त्यागले आहे. मनसेचे प्रवक्ते, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काम करण्यात अडचणी येत असल्याचे कारण पुढे करत हे राजीनामे देण्यात आले आहेत. शहराध्यक्ष गजानन काळे यांचे नवी मुंबई महापालिकेत आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अधिकारीवर्गाकडून आमच्या पत्रांची साधी दखल देखील घेतली जात नसल्याचे मनसे उपशहराध्यक्ष प्रसाद घोरपडे म्हणाले. याबाबत आपण वरिष्ठांना वारंवार तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने पक्षात नाराजी असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा :नवी मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आपल्याला अंतर्गत बाबींमध्ये त्रास देण्याचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून काळे करत होते. मी अनेकवेळा याबाबत वरिष्ठांना सांगितले. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपवला असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. गजानन काळे आपल्याविरोधात बैठका लावत असल्याचे सांगत काळे यांनी आपल्याला कार्यालयात येऊन धमकावल्याचा गंभीर आरोप फडतरे यांनी केला आहे.