मुंबई- महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मोठ्या दिमाखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीदरम्यान त्यांना महापुरुषांचा विसर पडल्याचा आरोप करत फुले-शाहू-आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय
शिवाजी पार्कपासून केवळ काही पावलांच्या अंतरावर 'चैत्यभूमी' आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या समाधीस्थळाला ठाकरे यांनी अभिवादन न केल्याने भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - नव्या सरकारच्या सहा मंत्र्यांनी घेतली शपथ; अशी आहे नवनिर्वाचीत मंत्र्यांची राजकीय कारकीर्द
'आज महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना महात्मा फुलेंसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले असते. त्यातच त्यांनी शपथ घेतानाही या दोन महापुरुषांचा साधा उल्लेखही केला नाही. शिवाय जवळच असलेल्या चैत्यभूमीकडे न जाता त्याहून दूर असलेल्या सिद्धिविनायक मंदिराकडे गेले आणि तेथे सिद्धीविनायकाचं त्यांनी दर्शन घेतले', अशी टीका करत ठाकरेंना महापुरुषांचा विसर पडल्याचे कांबळे म्हणाले.