मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. मात्र आता या ओल्या दुष्काळात मुंबईचा देखील समावेश करून एकाच वर्षात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित मुंबईकरांना मदत करण्याची मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
तेलंगणा सरकारकडून आदर्श घ्यावा - अतुल भातखळकर - अतुल भातखळकर
ओल्या दुष्काळात मुंबईचा देखील समावेश करून एकाच वर्षात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित मुंबईकरांना मदत करण्याची मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, कोरोना महामारीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना, मागील चार महिन्यांत तीन वेळा वादळासह झालेल्या बेसुमार पावसामुळे झोपडपट्टी तसेच चाळीत राहणाऱ्या लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना सरकारकडून तातडीची मदत करण्याच्या मागणीचे पत्र व निवेदन सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिले होते, परंतु त्यावर राज्याच्या 'तत्पर व कर्तव्यदक्ष' मुख्यमंत्र्यांनी मदत तर सोडाच पण साधे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश दिले नाहीत.
तेलंगणा सरकारने मागच्या आठवड्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे बाधितांना सरसकट १०,००० व घरांचे नुकसान झालेल्यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली, इथे मुंबईकरांना तर एकाच वर्षात ३ वेळा अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही सकारात्मक पावले उचलण्यात आली नसल्याचे देखील भातखळकर म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेकडे ७०,००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्या ठेवींना राज्य सरकारने हमी देऊन, १०,००० कोटी रुपये मुंबईकरांच्या मदतीसाठी वापरण्याची वारंवार मागणी करून सुद्धा कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मागील आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना आपण मदत करणार आहात, त्यांच्यासोबतच बेसुमार पावसामुळे घरांवर तुळशीपत्र ठेवावे लागत असलेल्या मुंबईकरांना सुद्धा आता तरी मदत करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली.