मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. देवरांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर संजय निरुपम यांनी टीका केली होती. त्यांच्या टिकेला आज काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले.
काय म्हणाले होते संजय निरुपम
मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांना केंद्रीय पातळीवर संघटनेत मोठे पद दिले जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यांच्या या राजीनाम्यावर काँग्रेसचे नेते संजय यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. राजीनामा देण्याची भावना अंतप्रेरणेतून येते. इथे तर राष्ट्रीय पातळीवरचे पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? पक्षाने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे वक्तव्य निरुपम यांनी केले होते.
काय म्हणाले भाई जगताप
त्यांच्या या टीकेला काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उत्तर दिले आहे. जगताप म्हणाले की, काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात ते जातीवादाचे व भाषावादाचे राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. एवढे करुनही ते २.७ लाख मतांनी पराभूत होतात. अशा कर्मठ नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे, असे म्हणत भाई जगतापांनी निरुपमांना टोला लगावला आहे.
संजय निरुपम आणि भाई जगताप यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये सध्या राजीनामा नाट्य सुरु आहे. राहुल गांधीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.