महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhagat Singh Koshyari Controversies : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप - राज्यपालांचे वादग्रस्त विधान

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजीनाम्याची मागणी अखेर मंजूर झाली आहे. ते आपल्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्या वादग्रस्त वक्तव्यांवर एक नजर टाकू या.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

By

Published : Feb 12, 2023, 11:28 AM IST

मुंबई :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला राज्यपाल पदावरून मुक्त करा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. अखेर त्यांची ही मागणी स्वीकारली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा अखेर राजीनामा मंजूर करण्यात आला. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची कोश्यारी यांच्या जागी वर्णी लावण्यात आली. कोश्यारींनी सातत्याने वादग्रस्त विधाने करून भाजपला अडचणीत आणले होते. आगामी निवडणुकीत त्याचा भाजपला फटका बसू नये, यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचे बोलले जाते.



कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त :महाराष्ट्रात राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत त्यांनी सतत अकलेले तारे तोडले होते. सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी लावून धरली होती. राज्यभरात या निषेधार्थ राज्यपालांविरोधात तीव्र निदर्शने केली गेली. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजप अडचणीत येत होती. भाजप शिंदेंसोबत सत्तेत आल्यानंतर ही राज्यपालांकडून वादग्रस्त विधाने सुरू होती. सरकारची यामुळे कोंडी होत होती. आगामी निवडणुकीत याचा फटका बसेल, या भीतीने अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर केल्याचे बोलले जाते.

'गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही' : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 29 जुलै 2022 ला मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला आले होती. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही,' असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

'समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' : समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचे आपल्या समाजात मोठे स्थान असते. तसेच, छत्रपतींनी मला माझे राज्य तुमच्या कृपेने मिळाले आहे, असे समर्थांना म्हटले होते, अशा आशयाचे वक्तव्य कोश्यारींनी केले होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान : भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. यावर कोश्यारी म्हणाले, कल्पना करा की, सावित्री बाईंचे लग्न 10 व्या वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतिचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबत कोश्यारींनी हे वादग्रस्त विधान केले होते.

नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंडित नेहरूंबद्दल बोलताना कोश्यारी म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असे त्यांना नेहमी वाटायचे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचे सरकार वगळता आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते, असे वक्तव्यही कोश्यारी यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

'शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत' : कोश्यारी हे 19 नोव्हेंबर 2022 ला औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले होते. या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केले होते. ते म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचे नाव घ्यायचे. मला असे वाटते की जर कुणी तुम्हाला विचारले की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

आमदार नियुक्त्या रखडल्या, बेकायदेशीर सरकार :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदार नियुक्त्या रखडल्या आहेत, असेही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. महाविकास आघाडीने यावरून राज्यपालांची कोंडी केली होती. येत्या अधिवेशनात राज्यपालांना यावरून धारेवर धरण्याची व्यूहरचना आखली होती. मात्र, त्यापूर्वीच केंद्र सरकारने राज्यपालांचा राजीनामा मंजूर केला आहे.

हेही वाचा : Maharashtra Governor : राष्ट्रपतींनी स्वीकारला कोश्यारींचा राजीनामा; रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details