मुंबई - राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर अनेक ठिकाणी पुतळे जाळण्याचा प्रकार घडला. यासंदर्भात कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. राज्यात तेढ निर्माण करणाऱ्या चिथावणीखोर विधानांना आणि भूलथापांना बळी पडू नका, आपला न्यायालयीन लढा अद्याप संपलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाचशे पानांचे निकालपत्र पाहिल्यानंतर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय मागास आयोग यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांंगितले.
फडणवीसांनी चिथावणी खोरांना थांबवावे -
मागासवर्गीय आयोगाला आपल्याला सर्व माहिती पुरवता येईल. त्या आयोगाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती महोदय त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकतात. अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकांना सूचना कराव्या. तसेच महाराष्ट्रात चिथावणी देण्याचा काम करणाऱ्यांना आपण थांबवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
राजकीय पोळी भाजण्यासाठी काहींचे उद्योग सुरु -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जे काही घडले आणि ज्या निर्लज्जपणे मते मिळवण्यासाठी घडले. त्या निवडणूकीवर हायकोर्टानेही ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता कृपया महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी तसेच राजकीय पोळी भाजण्यासाठी जो काही उद्योग अनेकांनी सुरु केला आहे. त्याला महाराष्ट्रातील जनतेने बळी पडू नये. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आपल्याला पुढचे पाऊल टाकायचे आहे, असे ते म्हणाले. आपण सगळे सोबत आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे की, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे कोणीही चिथावणी देण्याचे काम कोणीही करु नये, असे आवाहन विरोधी पक्षातील नेत्यांना चव्हाण यांनी केली.