मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्च पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा बंद आहे. शहरातील जनजीवन सुरळीत होत असताना रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचा सर्व भार बेस्टच्या बस सेवेवर आला आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या २५० बसेस बेस्ट उपक्रमाकडून भाडेतत्वावर घेतल्या गेल्या आहेत. त्यापैकी ७६ गाड्या बेस्टला मिळाल्या असून त्या आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
'बेस्ट'च मुंबईतील प्रवाशांसाठी 'लालपरी' धावली
मुंबईतील लोकलसेवा सध्या सामान्य प्रवाशासांसाठी बंद आहे. त्यामुळे बेस्टच्या बस सेवेवर भार पडत आहे. या दरम्यान प्रवाशांना वेळेत सेवा मिळावी म्हणून बेस्टने एसटी महामंडाळाची मदत घेतली आहे. बेस्टने २५० एसटी बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत.
कोरोनाचा प्रसार होत असल्याने मार्च पासून देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन असताना ट्रेन सेवा बंद केल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बसेसद्वारे नियोजित स्थळी पोहोचवले जात होते. ८ जुनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बेस्ट बस धावू लागली आहे. आजही लोकलचे दरवाजे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच आहे. त्यामुळे लोकलचा प्रवासी बेस्ट बसेसकडे वळत असल्याने बेस्ट परिवहन विभागावर प्रवाशांचा भार येत आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३,५६० बसेस आहेत. त्यापैकी प्रवाशांच्या सेवेत रोज तीन हजार बसेस धावत आहेत. बेस्टची प्रवासी संख्या १६ लाखांच्या घरात पोहोचली आहे.
बेस्ट बसेसवर प्रवाशांचा वाढता भार पहाता बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाकडे भाडेतत्त्वावर २५० बसेसची मागणी केली होती. बेस्ट उपक्रमाच्या मागणीपैकी ७६ गाड्या एसटी महामंडळाने दिल्या आहेत. या गाड्या गुरुवारपासून बस मार्ग क्रमांक ४ नंबर लिमिटेड, ७ नंबर लिमिटेड, ८ नंबर लिमिटेड, सी ७२ व ३० नंबर लिमिटेड या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली आहे. बेस्टच्या बस बरोबर आता एसटीच्याही बसेस रस्त्यावर धावू लागल्याने मुंबईकर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अनलॉक नंतर मुंबईत नोकरीसाठी येताना होणारी गर्दी पाहून बेस्टने एसटीकडून अडीचशे गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति किलोमीटर ७५ रूपये भाड्याने या बसेस घेण्यात येणार असून त्यातूनच एसटी महामंडळाला इंधन, मेन्टेनन्स, ड्रायव्हर आणि कंडक्टरचा खर्च दिला जाणार आहे.