मुंबई- आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला वाचविण्यासाठी भाडे कपात करण्यात आली. भाडे कपात केल्यावर प्रवाशांना बेस्टकडे वळविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून बेस्टची मार्केटिंग केली जात आहे. अशाप्रकारे मार्केटिंग करून बेस्टमध्ये प्रवासी वाढवण्यास कर्मचारी आणि प्रशासनाला यश येताना दिसत आहे. या प्रयत्नांमुळे येत्या काळात बेस्टच्या बसेस पुन्हा प्रवाशांनी भरून जाताना दिसू शकणार आहेत.
प्रवासी वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून बेस्टचे मार्केटिंग - कर्मचाऱ्यांकडून बेस्टची मार्केटिंग
प्रवाशांना बेस्टकडे वळविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून बेस्टची मार्केटिंग केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे.
बेस्ट उपक्रमावर २५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार, थकबाकी तसेच उपक्रमाचा दैनंदिन कारभार चालवणे अवघड झाले होते. यावर उपाय म्हणून बेस्टला सुधारणा करण्याचे सुचविण्यात आले होते. यावर महापालिका आयुक्तांनी भाडेकपात आणि खासगी गाड्या भाड्याने घेण्याचे सुचविले. त्यानुसार बेस्टने टिकत दरात कपात करून ५ किलोमीटरसाठी ५ रुपये तर एसी साठी ६ रुपये भाडे केले. त्याची अंमलबजावणी मंगळावरपासून करण्यात आली. बेस्टचे दर कपात केल्यावर रिक्षा आणि टॅक्सीने जाणाऱ्या प्रवाशांना आता बेस्टकडे वळविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून ५ रुपयात कुठेही प्रवास करा, अशी मार्केटिंग केली जात आहे. त्यासाठी कर्मचारी फलक घेऊन, प्रवाशांना आवाहन करताना दिसत आहेत.
बेस्टचे तिकीट दर कमी केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे बेस्टचे प्रवासी वाढल्याचे दिसून येत आहे. बेस्टकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सोमवारी ८ जुलै रोजी बेस्टच्या १७ लाख १५ हजार ४४० तिकीटांची विक्री झाली होती. त्यामधून बेस्टला २ कोटी १२ लाख ३३ हजार २६० इतके उत्पन्न मिळाले होते. काल (मंगळवारी ९ जुलै) दर कपात लागू झाल्यावर बेस्टची २२ लाख १८ हजार २५३ इतकी तिकीट विक्री झाली असून त्यामधून बेस्टला १ कोटी ४५ लाख १८ हजार २५३ इतके उत्पन्न मिळाले आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी ५ लाख २ हजार ८१३ तिकीट विक्री वाढली असून ६६ लाख ९८ हजार ५६३ रुपयांनी उत्पन्न घटले आहे. बेस्टच्या तिकिट विक्रीत २९.३१ टक्क्यांनी वाढ झाली असून ३१.९५ टक्क्यांनी उत्पन्न घटले आहे.